Keyboard synthesizer च्या माध्यमातून संगीत शिकवायची सुरुवात आणि त्या प्रवासाविषयी थोडेसे.
साधारण १९९५ साली उत्तम guitarist आणि माझा मित्र नितीन कुलकर्णीनी त्याच्या डेक्कनच्या चालुक्य Restaurent जवळच्या Musico Institute मध्ये “खूप लोक चौकशी करत आहेत. तू Synthesizer शिकवशील का?” अशी विचारणा केली. एक दोन दिवस स्वतःशी विचार केला, मला शिकवता येईल की नाही या विषयी घरी चर्चा करून मी त्याला हो म्हणालो. तेव्हा Casio च्या चार सप्तकांच्या छोट्या Synthesizer ची किंमत 3 हजारच्या आसपास होती. पैसे जमा करून तसे २ घ्यायचे ठरवले.
Sonali Patharkar ही माझी college मधली मैत्रीण. तिने तिच्या जवळचा Casio चा एक पांढऱ्या रंगाचा सुंदर Synthesizer विश्वासानी वापरायला दिला. आणि ती आणि तिची दिदी शिकायला पण येऊ असं म्हणाल्या. अजून एक दोन विद्यार्थी महिन्याभरात मिळाले आणि शिकवायच्या शाळेत, विद्यार्थी म्हणून माझा प्रवेश झाला.
घरात छोट्या बाळाचा जन्म झाला की, श्री. व सौ. यांची पती-पत्नी या नात्याच्या एक पायरी वर, आई-वडील म्हणून बढती होते..
तसंच काहीसं..
इथे मला शिकवायचं शिक्षण द्यायला दुसरं कुणीच नव्हतं. “कला शिकवणं” याकरता विद्यार्थ्याला समजून घेऊन, त्याची कला आत्मसात करायची ताकद समजून शिकवावं लागतं. एखाद्याच्या “कलानी घेणं” म्हणजे काय, याचा प्रत्यय येऊ लागला.
तिसऱ्याच आठवडयात, माझ्या पहिल्या काही विद्यार्थ्यांपैकी एकानं पहिलं एक गाणं न चूकता, दोन्ही हातांनी पूर्ण वाजवून दाखवलं.. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अजून आठवतोय मला.
.. आणि मी…
संगीत शिक्षक म्हणून पहिली चाचणी परिक्षा पास झालो..! म्हणजे माझ्या विद्यार्थ्यानीच मला अजाणतेपणी पास केलं होतं.
माझ्या चेहऱ्यावरचा आनंद कुणालाच मोजता येणार नाही इतका होता.. आणि तरी मी तो कुणालाही दाखवू शकत नव्हतो!
पहिला student रबरी tube न घेता पोहू लागला तर्री त्या swimming teacher ला हा आनंद त्या student च्या parents ला सांगता येत नाही… तसंच काहीसं..
आणि हा आनंद मनात दडवून ठेवावा लागतो किंवा, त्याला काडीचाही आधार न देता बुडवावा लागतो.
शिकवायच्या कलेमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे, विद्यार्थ्याच्या कलेच्या, बुद्धीच्या किंवा दोन्ही पातळीवर एकाच वेळी येऊन शिकवलं तर विद्यार्थी ती गोष्ट शिकायची शक्यता वाढते.. त्याच्या आवडीच्या क्षेत्रातली उदाहरणं दिली की पटकन् समजतं.
१९९९ साली डेक्कनचा क्लास सोडून हॅपी कॉलनीत घराजवळ दुकान भाड्यानी घेऊन स्वतंत्र क्लास चालू केला. Musicomp Institute. Music आणि Animation.
हो, या दरम्यान मी 3D animation करायलाही शिकलो होतो आणि त्याचेही १०-१२ विद्यार्थी शिकवून तयार केले होते. पण त्या विषयी पुन्हा केव्हा तरी सांगेन.
या सर्व प्रवासात खूप शिकायला मिळालं, अनुभव मिळाले.
लहान मुलांचे किंवा मोठ्यांचेही निरागस, बाळबोध प्रश्न, ज्यांना सांगीतिक भाषेत उत्तरं नसतात, त्यांची समाधानकारक उत्तरं द्यावी लागली. विद्यार्थानी विचारलेला प्रश्न इ. पहिलीतला असेल आणि तुम्ही स्वतः अगदी “सवाई” मध्ये शेवटच्या दिवशी कला सादर करत असाल, तरी उत्तर मात्र इ. पहिलीच्याच भाषेत द्यावं लागतं. काहीही गृहीत धरून चालत नाही. कारण, विद्यार्थ्याला कळलं नाही, तर संगीतविषयक आकर्षण कमी होईल, किंवा न्यूनगंड निर्माण होईल आणि एक विद्यार्थी कमी होईल या भीतीपेक्षा एक संगीतप्रेमी कमी होईल ही काळजी जास्त!
तेव्हापासून २००३ साली क्लास बंद करेपर्यंत खूप वेगवेगळे अनुभव आले.
एक चिमुरडी विद्यार्थीनी, जिचं वय वर्ष ३.. तिलाही शिकवलं आणि एक आजोबा – वय वर्ष ७५ – त्यांनाही शिकवता आलं.
चिमुरडीला शिकवताना अनुकरण करायला ती एकदम तयार.. पण शब्दसंचय (सोप्या भाषेत vocabulary) नसल्यानी तिला इतर कुठली उदाहरणं नाही देता यायची. त्यामुळे तिच्या बरोबर वाजवायला बसलं तर दहा दिवसाला एक गाणं उडवायची ती.
आणि आजोबा मराठीचे प्राध्यापक. त्यामुळे वाचन, लिखाण, कविता सगळं माहिती.. पण बोटं वळायची नाहीत. तर एकदा ते वैतागुन मला म्हणाले “अद्वैत सर, मी चूकलो की तुम्ही मला रागवत नाही! म्हणून मला येत नाही. वयानी मोठा असलो तरी संगीत क्षेत्रात अनुभवानी तुम्ही मोठे आहात. तूम्ही रागवा मला, तरंच मला येईल!”
मला थोडी मजा वाटली. त्यांच्यावर झालेले संस्कार कळले. पुढच्या तासाला प्रयत्नपूर्वक मी थोडासा आवाज चढवला.. ..
आणि आजोबांच्या डोळ्यांत पाणी तरळलं. थोडासा चुकारपणा करून गालावरही ओघळलं .. पण मात्रा बरोब्बर लागू पडली होती! आजोबा थोड्यावेळानी डोळे पुसत, न चुकता वाजवू लागले होते.. मग आम्ही दोघांनी क्लास बाहेरच्या टपरीवर चहा पिऊन तो आनंद साजरा केला होता.
शिकवताना शिकायला मिळतं, आपलही ज्ञान वाढतं, ते हेच, किंवा असंच.
या दरम्यान एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे, जन्मतः आपल्या अंतरंगात, कलेचा एक किंवा अनेक कप्पे त्यावर लेबलं लावून दिलेले असतात. आपल्या आयुष्याच्या प्रवासात, एखाद्या प्रसंगानी केव्हा तरी त्यातलं एखादं दार किलकिलं होतं आणि आपल्याला आत दडवून ठेवलेल्या “त्या” गोष्टीविषयी विलक्षण ओढ वाटू लागते. ध्यास लागतो!
एखाद्या कलेचा कप्पा नसेल तर ती कला मर्यादित स्वरूपात साधता येते.
(यात – शेजारच्यांची मुलगी अमुक शिकते तर आपलाही मुलगा मागे नको पासून माझा मित्र जातो म्हणून, किंवा क्लास घराजवळ आहे … पर्यंत काहीही कारणं असू शकतात)
पण कप्प्यात जी कला भरली आहे, तीच शिकू लागलो तर त्यात पारंगत होता येतं.. आणि आयुष्याचा आनंद गवसतो. पण त्यासाठी त्या कलेला घासून पुसून स्वच्छ, चकचकीत ठेवायचं काम सतत करावं लागतं. अशीच ही शिकवायची कला गवसली मला.
कला या सहसा एकट्या दुकट्या नाहीत, तर जमावानी हिंडतात, वसतात.
आता माझंच उदाहरण घ्यायचं तर, १९७७ साली मी ५ वर्षांचा असताना कुर्बानी चित्रपट पाहून आल्यावर त्यातली गाणी पेटीवर बिनदिक्कत वाजवू लागलो. संगीतकलेचं दार किलकिलं नाही, तर सताड उघडलं!
पण याबरोबरंच थोडीशी चित्रकला, फोटोग्राफी, animation, graphic design आणि इतर काही कला चिकटून एकत्र आल्या माझ्यात.
आणि सगळ्यात शेवटी दार उघडलं ते म्हणजे लिखाणाच्या कलेचं.
आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवायचे अनेक मार्ग असतात.
अगदी गुंडगिरी करून धमकावून एखादी गोष्ट बळजबरीनी करून घेण्यापासून, कला जोपासून तिचं लोकार्पण करण्यापर्यंत. आणि शिकवायची कला आत्मसात करून कलेचा शिक्षक होण्यापर्यंत.
तर मित्रांनो, २००३मध्ये शिकवणं थांबवलं त्याआधी काही विद्यार्थी खरंच चांगले मिळाले. त्यातले बरेच जण ह्याच क्षेत्रात आहेत.
Kedar Bhagwat, Suraj Doshi यांनी स्वतःच्या music institutions सूरू केल्या आणि त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतों आहे. Shweta Sathaye नंतर पियानो मध्ये पारंगत झाली आणि ती आता पाश्चात्य पियानो वादन छान शिकवते.
तसंच Darshana Jog, Amruta Thakurdesai, Pratik Rajopadhye, Sant Nachiket Shreepad, हे रंगमंचावर देश विदेशात keyboard synthesizer वर प्रतिथयश कलाकारांसोबत आपली कला सादर करत असतात.
या आणि माझ्या इतर सगळ्याच विद्यार्थ्यांनी मला खूप समाधान दिलं आहे.
२००५ पासून मी माझ्या सांगीतिक कामांमध्ये बराच व्यस्त होतो आणि आहे. त्यामुळे इतकी वर्ष शिकवायला वेळ मिळत नव्हता पण आता वेळात वेळ काढून थोड परत सुरु करावं म्हणतोय.
मोजक्या लोकांनाच शिकवणार आहे. ज्यांना माझ्याकडून keyboard synthesizer शिकायची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी whats app वर संपर्क साधावा ही विनंती
मी online शिकवणार आहे. त्यामुळे घरी स्वतःचा keyboard असणं गरजेचं आहे.
सुरुवात करताना कुठल्याही सांगीतिक ज्ञानाची आवश्यकता नाही. फक्त इच्छा पुरेशी असते
धन्यवाद,
आपला अद्वैत पटवर्धन.