पुलंच्या “बिगरी ते मॅट्रीक” मध्ये एक वाक्य आहे.
“शाळेमध्ये बापानी येणं, हे बाप, मुलगा आणि मास्तर… ह्या तिघांनाही रूचत नसे. परस्परांचे संबंध संपूर्णपणे तिरस्कारावरच आधारलेले होते!”
पण आता काळ नक्कीच बदलला आहे.
मी किबोर्ड शिकवायची online शाळा सुरू केल्यानंतर,
गेल्या ३ महिन्यापासून एक-एक करत वडिल आणि मुलगा अशा ४ जोड्या माझ्याकडे सध्या शिकत आहेत. २ जोड्या पुण्यातल्या, १ मुंबई आणि एक जोडी म्युनिक जर्मनी इथली.
ह्यात वडिल आणि मुलगा ह्यांच्यामध्ये
“सरांनी आज तुला काय शिकवलं?” असं – नं खडसावता – आणि “अहो बाबा, असं नाही … हे पहा .. हे असं शिकवलंय अद्वैत काकानी” असे प्रेमळ संवाद चालतात.
तसंच ३ खास जोड्या आहेत.
७ वर्षाचे दोन वर्ग सोबती शिकत आहेत ते त्यांच्या आयांसोबत. म्हणजे मी सांगितलेल्या सूचना, शिकवलेल्या गोष्टी, ह्या दोन माता, त्यांच्या त्यांच्या चिमुरड्यांकडून करून घेतात. स्वतःला संगीताचं कुठलंही ज्ञान नसताना.
(इथे “स्वतः” हा शब्द त्या दोन माऊलींसाठी वापरतोय .. नाहीतर तुम्हाला वेगळीच शंका यायची)
आणि तिसरी खास जोडी नात आणि आजोबांची.
नात शिकते आणि आजोबा लक्ष ठेवायचं काम करतात. मात्र तिला -आजोबा आणि मी- असं दोघांनी कौतुक केल्या शिवाय पान हलत नाही बाई साहेबांचं.
ह्यांना शिकवताना त्यांची छोटी छोटी बोटं keyboard वर दोन्ही हातांनी वाजवू लागली की फारं भारी वाटतं. काय वाजवायचं आहे हे कळल्यावर, ते सुर keyboard वर शोधताना त्यांची होणारी निरागस पळापळ बघून एकदम मस्त वाटतं!
Online tutions घेताना बरेच मनोरंजक किस्सेही घडतात.
विद्यार्थ्याचा किबोर्ड, हाताचे पंजे आणि कोपरापर्यंतचा भाग दिसला की काम होतं. त्यामुळे बरेचदा चेहरा दिसतोच असं नाही. त्या त्या window खाली विद्यार्थ्याचं नाव दिसत असतं, त्याप्रमाणे मी हाक मारून शिकवतो. म्हणजे तसा नियमच केला खालचे किस्से घडल्यावर …
तर एकदा एका बॅच मध्ये एका स्त्री “The Avengers” चं आगमन झालं!
अजून तरी हातातून वाजणाऱ्या सुरांवरून व्यक्ती ओळखता येत नाही मला.
“The Avengers” कोण आहे? असा प्रश्न बरेचदा विचारून झाला पण Avengers ताई काही उत्तर देईनात …
जरा वेळानी उलगडा झाला. ती माझी संगीत क्षेत्रातलीच मैत्रीण होती आणि तिच्या मुलानी शाळेतल्या मित्रांच्या zoom meeting साठी device name बदललेलं तिलाही माहित नव्हतं … !
त्यामुळे “The Avengers” उत्तर देत नव्हते ..
पण तेव्हापासून आमच्या गृप मध्ये आम्ही सगळे तिला “The Avengers” असं आदरानी हाक मारतो.
एका बॅच मध्ये एका ७ वर्षांच्या छोट्या मैत्रीणीला तिच्या पहिल्या session मध्ये नावानी हाक मारून बोलवत होतो .. छोट्या मुलांशी संवाद साधताना बोलतात तसं बोलत होतो .. पण ती काही प्रतिसाद देईना … मी परत परत हाक मारतोय ..
“आज एका मुलीच्या t-shirt वर मिकी माऊस कसला गोड आहे “
“आज काय खेळलीस?” वगैरे प्रयत्न करून झाले.
मनातलं एक department “काहीतरी चुकतंय रे…. !” असं ओरडून सांगत होतं.
झटकन् spreadsheet उघडला आणि नाव वाचलं
इतका वेळ मी तिला तिच्या आईच्या नावानी हाक मारत होतो…!!!
पटकन आवाज normal ला आणला आणि त्या मातेची क्षमा मागुन device name बदलायची विनंती केली!
पण तोपर्यंत नक्की काय घडलं आहे, ते बॅचमध्ये सगळ्यांना अगदी व्यवस्थित कळलं होतं. त्यामुळे आम्ही सगळे मनमुराद हसलो.
छोट्या मुलांना शिकवण्यात एक मुख्य आव्हान असतं ते म्हणजे ह्या छोट्या दोस्तांकडे शब्द संचय कमी असतो. त्यामुळे त्यांना समजवण्याकरता घरचं कुणी बरोबर असेल तरंच हे शिक्षण जमू शकतं.
मी keyboard synthesizer चे online classes घ्यायला सुरुवात करून २० डिसेंबर २०२० ला ६ महिने पुर्ण झाले.
पुणे, मुंबई, सांगली, मिरज, Hong Kong, Singapore, Usa, Middle East आणि Germany मधूनही बरेच लोक शिकत आहेत. त्यातल्या काही विद्यार्थ्यांची ४ ५ गाणी शिकूनसुद्धा झाली आहेत.
उदंड प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.
अजुनही कुणाला शिकायचं असेल तर माझ्याशी Whats app मध्ये संपर्क साधावा.
धन्यवाद